Sunday, May 15, 2011

सामाजिक आणि ग्रामीण विकास कामातील अनुभव

१. श्री व्यंकटेश ज्ञान आणि मनोरंजन मंडळ : इयता ७ वीत असतांना मित्र मंड्ळींना सोबत घेऊन “ श्री व्यंकटेश ज्ञान आणि मनोरंजन मंडळा “ ची गावात स्थापना केली. या मंडळामार्फत किशोर आणि युवकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असत. ज्यात ग्रामस्वच्छता, सहल, सामुदायीक पुस्तक वाचन आणि ’ साप्ताहिक प्रश्न ’ यांचा समावेश होता. यातील ’ साप्ताहिक प्रश्न ’ हा उपक्रम सर्वाधिक महत्वाचा उपक्रम होता. या उपक्रमांतर्गत, ज्यांना जो प्रश्न पडला असेल त्याम्ने तो साप्ताहिक बैठकीत ठेवावा, उपस्थितांपैकी ज्यांना प्रश्नाचे उत्तर माहित असेल , त्यांने त्या प्रश्नाचे निराकरण करावे, एखाद्या प्र्श्नाचे उत्तर लगेच बैठकीत मिळाले नाही तर अशा प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची प्रमुख जबाबदारी माझ्यावर होती.

’ साप्ताहिक प्रश्न ’ या उपक्रमातील त्या काळी न सुटलेला एक प्रश्न अजूनही माझ्या स्मरणात आहे. तो प्रश्न असा होता की, “ पुराणे सांगतात की, पॄथ्वी सपाट असून शेष नागाने आपल्या डोक्यावर पेललेली आहे आणि विज्ञान सांगते की, पॄथ्वी गोल असून स्वत: भोवती फिरता-फिरता सुर्याभोवती फिरते , यातील खरे काय ? उपलब्ध असलेली सर्व पुस्तके वाचली, माझे धार्मिक गुरु असलेले ह. भ. प. श्री बाळासाहेब महाराज यांचेशी चर्चा केली, पण एकांगीच उत्तर मिळत होते, समाधान होत नव्हते. शेवटी हा प्रश्न मी माझ्या शाळेतील ३ शिक्षकांना विचारला. सर्व शिक्षकांनी एकच उत्तर दिले “ पुराणाच्या दॄष्टीने पुराणांचे बरोबर आहे, आणि सायन्सच्या दॄष्टीने सायन्सचे बरोबर आहे”. अर्थात त्यावेळी प्रश्न अनुत्तरीतच राहीला. मी इयत्ता ९वीत असतांना मला स्वामी दयानंद सरस्वती यांचे “ सत्यार्थ प्रकाश “ नावाचे पुस्तक वाचायला मिळाले, ज्यात स्वामी दयानंद सरस्वती यांनी पॄथ्वी शेषाच्या डोक्यावर आहे, असे म्हणणाऱ्यांना प्रश्न विचारला होता की, जेव्हां शेषाचे आई-वडील जन्मले तेव्हां पॄथ्वी कशावर होती ? असा प्रश्न विचारून व वेदाचा हवाला देऊन पॄथ्वी गोल असून , ती सुर्याभोवती फिरते , असे प्रतिपादन केले होते. मला अनुत्तरीत राहीलेला प्रश्न तब्बल २ वर्षाने सुटला. या निमित्तने मला हे जाणवले की, “ धार्मिक विश्वासाच्या विरुध्द बोलण्याची हिम्मत त्याकाळच्या शिक्षकांत सुध्दा नव्हती”.

२. स्वामी अग्निवेशजीच्या संपर्कात- हायस्कूलला शिकत असतांनाच आर्य समाजच्या संपर्कामुळे “ बंधुआ मुक्ती मोर्चाचे “ प्रमुख आणि माववी हक्काचे प्रबळ समर्थक स्वामी अग्निवेश यांच्या संपर्कात येऊन “ आर्य युवक परिषद “ आणि वेठबिगार मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र “ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण चालु असतांना १९७५ ला आणीबाणी जाहीर झालेली होती. या काळात मी एन एस एस चा व्हालींयटर लीडर म्हणून पण काम करत होतो, यामुळे एन एस एस च्या कॅम्पमध्ये व कॉलेजमध्ये पण आणीबाणी विरोधात बोलत होतो, एकदा वर्गात आणीबाणी विरोधात भाषण देत असतांना प्राचार्यांनी ऎकले आणि सुणावले “ गोजमे , तुमच्या भावना मी समजतो, पण तुमची ही भाषणे कॉलेजमध्ये देऊ नका, आल का लक्षात ? ”. या काळात माझे कांही मित्र व समविचारी मंडळी जेलमध्ये गेली, माझ्यावर हा प्रसंग टळला तो माझ्याविषयी सहानुभुति असणाऱ्या कांही मंडलीमुळे ! आणीबाणी नंतर निवडणुका लागल्या, माझे बी ए चे शेवटचे वर्ष होते, जनता पार्टीच्या बाजूने प्रचात सहभागी होऊन काम करत होतो. माझे कांही मित्र मला म्हणायचे, ’ गोजमे, हे शेवटचे वर्ष आहे तुम्ही हे काय चालवल आहे ? ’. मला मात्र वाटायचे की, “ बी ए च्या तिसऱ्या वर्षाची परिक्षा तर नंतर पण देता येयील , परंतु ही आणीबाणी कायमची डोक्यावर बसली तर ? ”.

३. छात्र युवा संघर्ष वाहीनी मध्ये सहभाग – आणीबाणीत लोकनायक ’ जयप्रकाश नारायण ’ यांनी केलेले ऐतिहासिक कार्य आणि त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळे त्यांच्याविषयी मनामध्ये अतिशय आदर आणि श्रधेची भावना होतीच, आणीबाणी नंतर महाराष्ट्रात कार्यरत झालेल्या छात्र युवा संघर्ष वाहीनी मध्ये माझ्या कांही मित्रमंडळी सोबत ७७-७८ मध्ये सह्भागी होण्याची लगेच संधी मिळाली. मला याचा आज अभिमान वाटतो की, “ त्या काळात जी-जी तरुण मंडळी छात्र युवा संघर्ष वाहीनी मध्ये कार्यरत होती, ती सर्व मंडळी अजूनही समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी बजावत आहेत. याशिवाय देशभरात वेळेवेळी कार्यकर्त्यांच्या गोळक्यात भेटणारे छात्र युवा संघर्ष वाहीनचे कार्यकर्ते लगेच ओळखता येतात, ते वैचारीक मांडणीतून ! छात्र युवा संघर्ष वाहीनच्या माध्यमातून मला जी वैचारीक शिदोरी मिळाली, त्याचे दोन फायदे झाले, एक सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे रुढीग्रस्तेतून मुक्तता आणि दुसरे म्हणजे चिरंतन विकासाबाबतची दॄष्टी. रुढीग्रस्तेतून मुक्ततेचा माझ्यावर त्याकाळी तातडीने झालेला परीनाम म्हणजे ,” माझ्या गळ्यातील यजोपवित मी उतरवले, जे आर्य समाजच्या संपर्कामुळे आले होते.”

४. डी.एड कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आमरण उपोषण : छात्र युवा संघर्ष वाहीनीचे आमच्या जिल्ह्यात जेव्हा काम सुरु झाले तेव्हा आम्ही अविभक्त उस्मानाबाद जिल्ह्यात होतो. संघटनेचे काम सुरु झाल्यानंतर सर्व मित्रांनी माझ्यावर ’ जिल्हा संघटक ’ पदाची जबाबदारी सोपवली.या काळात प्रबोधनपर कार्यक्रमांतर्गत बैठका, सभा,शिबीरे यावर अधिक भर देण्यात आला होता. छात्र युवा संघर्ष वाहीनच्या माध्यमातून काम करत असतांना माझ्या दॄष्टीने लक्ष्यात राहीलेले आणि यशस्वी ठरलेला आंदोलन म्हणजे लातूरच्या उप्जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “ डी.एड कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आमरण उपोषण “. मागील वर्षात झालेला राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप, प्राध्यापकांचे झालेला संप आणि विद्यांर्थ्यांनी केलेला संप याचा परिणाम म्हणून मुरुड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील ४३ विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक तितकी भरली नाही, यामुळे शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी ,या विद्यार्थ्यांचा परिक्षा निकाल राखून ठेवला आणि पुन्हा प्रवेश घ्यावा असा आदेश तेव्हां काढला , जेव्हां पुढील वर्षाचे दुसरे सत्र सुरु झाले होते. या अन्याय आदेशाविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी १५ दिवस आधी प्राचार्य व उपजिल्हाधिकारी यांना नोटीस देऊन , उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषाण सुरु केले. याबाबत मी अगदीच टोकाची भुमिका घेतली म्हणुन माझ्या संघटनेतील माझे मित्र सुभाष निंबाळकर, ओमप्रकाश निलंगेकर आणि नंतर शेतकरी संघटनेच्या बळावर निवडून येऊन आमदार झालेले श्री शिवराज तोंडचीरकर अस्वस्थ झाले होते. सतत ७२ तासांच्या उपोषण आणि समाजवादी कार्यकर्ते श्री वा. ग. बेंबळकर यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री ना. सदानंद वर्दे यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आंदोलनाला यश मिळाले. शिक्षण उप्संचालकांनी आपला आदेश वापस घेतला व विद्यार्त्यांचा निकाल घोषित झाला. सतत केलेल्या ७२ तासांच्या उपोषणामुळे माझे वजन ६-७ पौंडाने कमी झाले परंतु, ४३ विद्यार्थ्यांचे नुकसान टळले , यापैकी पुढे अनेकजन शिक्षकपदी कार्यरत झाले याचा मला मनस्वी आनंद झाला.

५. आदीवासी ठाकर विवाह संस्थेवरील संशोधन : छात्र युवा संघर्ष वाहीनीमध्ये काम करत असतांना आदीवासी भागात काम आणि सोबत संशोधन अशी संधी हाताशी आली. मुंबई येथील ’ अकादमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स ’ कडून रायगड (तेव्हांचा कुलाबा) जिल्हयातील कर्जत आदिवासी उपविभागात “ कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकर विवाह संस्था आणि संबधित समस्या “ या विषयावर संशोधन आणि सोबत कार्यकर्ता म्हणून काम करणेसाठी ’ अकादमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स ’ ने फेलोशिप मंजूर केली. आदिवासींच्या विषयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ प्रो. श्री एस. डी. कुलकर्णी हे गाईड म्हणून मिळाले. ७९-८० या काळात आदिवासी ठाकर यांच्या सम्पर्कात राहून “ कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकर विवाह संस्था आणि संबधित समस्या “ या विषयावरील प्रबंध यशस्वीरित्या पुर्ण करुन तो ’ अकादमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स’ ला सादर केला.

या दरम्यानच्या काळात आदिवासींच्या सुख-दु:खात सहभागी होऊन जे-जे शक्य होईल ते – ते त्यांच्यासाठी केले, यामूळे आदिवासींचा वकील म्हणुन आदिवासीकडून गौरव झाला. माझ्या कामाचाच अत्यावश्यक भाग म्हणून केलेल्या प्रयत्नातून तीन आदिवासींची वेठबिगारीतून मुक्तता करण्याची संधी येथे मिळाली. याच काळात येथील आदिवासींसाठी ’ शिपाई’ नावाचे ह्स्तलिखित पाक्षिकाचे संपादन पण केले.

६. रचनात्मक संघर्ष समितीची स्थापना: आदिवासी विवाह संस्थेवरील संशोधन पूर्ण करुन परत आल्यानंतर परत छात्र युवा वाहीनीच्या कामात सहभागी झालो. एक नवी समस्या समोर आली होती, छात्र वाहीनीच्या नियमानुसार वयाच्या ३५ शी नंतर वाहीनीत रहाता येत नव्हते, माझ्यासाठी लगेच ही समस्या नव्हती, परंतु माझ्या अन्य मित्र मंडळीसाठी ही समस्या होती, यामूळे नवी संघटना स्थापन करण्याचा विचार समोर आला, यातून “ रचनात्मक संघर्ष समिती, महाराष्ट्र “ उदयास आली.

७. पत्रकारितेचा अनुभव: दरम्यानच्या काळात १९८१-८२ मध्ये पूर्णवेळ पत्रकारीतेचा अनुभव घेतला, दै. गोदातीर समाचार , लातूर आवॄतीसाठी सह्संपादकची जबाबदारी पार पाडली. ज्या काळात टी व्ही, फॅक्स आणि संगणक ही साधणे उपलब्ध नव्हती, अशा परिस्थितीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बातम्या रेडिओ वरून घेऊन, त्या वॄतपत्रात छापाव्या लागत असत. याच वेळी पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ’ दै. श्रमिक विचार ’ या पेपरसाठी पण लिहित असे, हा माझ्या आवडीचा पेपर होता. पुढे गोदातीर समाचार सोडल्यानंतर दै. सकाळ, दै. लोकमत समाचार, दै. लोकमन आणि सा. मराठी ब्लिट्झ साठी पण ४-५ वर्षें लिहिल, परंतु पुढे ग्रामीण विकास लोक संस्था आणि रचनात्मक संघर्ष समितीच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे नंतरच्या काळात लिहिणे थांबवले.

८.विद्यापीठ नामांतर आंदोलनात सह्भाग: मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्यात यावे असा ठराव मराठवाडा विद्यापीठ सिनेट आणि राज्य विधिमंडळाने करून सुध्दा विद्यापीठ नामांतर अमलात येत नव्हते, नामांतरवाद्यासाठी हा एक अस्मियतेचा मुद्या बनून राहिला होता. यात मी पण सहभागी होतो. नामांतराचा लढा तीव्र करणेसाठी नामांतरवाद्यांच्या वतीने १९८२ ला मुंबईला विधानसभेवर विशाल मोर्चा काढण्यात आला. यात डाव्या पक्षासह भाजपा पण सहभागी झाला होता. यात नव्याने स्थापन केलेल्या ’ रचनात्मक संघर्ष समिती, महाराष्ट्र ’ च्या वतीने मी एकमेव प्रतिनिधि सहभागी होतो. मुम्बईला जाण्यासाठी लातूरहून दलीत पॅंथरच्या तुकडीत सहभागी झालो. विधानसभेवर काढण्यात आलेला मोर्चा सरकारकडुन काळ्या घोड्याजवळच अडविण्यात आला. सत्याग्रहीच्या पहिल्या तुकडीचे नेतॄत्व माई आंबेडकर करत होत्या, प्रथम त्यांना त्यांच्या तुकडीसह अटक झाली, मी याच तुकडीत होतो, परंतु बसमधून सत्याग्रहींना जेलमध्ये पाठवत असतांना माझा नंबर यानंतरच्या तुकडीत लागला. ही दुसरी तुकडी ’ भाजपा ’ ची होती. अटकेच्या दिवसी रात्री उशीरापर्यंत आमच्या तुकडीस मुअंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले. सहभागी सत्याग्रहींना १४ दिवसाची जेल झाली. दुसऱ्या दिवसी आमची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये झाली.योगायोगाने ज्या तुकडीत मी आलो, त्यात तत्कालीन भाजपाचे राज्य सरचिटणीस श्री प्रमोद महाजन आणि श्री गोपीनाथ मुंडे, मधु पनवलकर इ. अन्य नेते पण होते, या नेत्यांबरोबर जेलची शिक्षा सुकर झाली.

९. ग्रामीण विकास संस्थेची स्थापना : याच दरम्यान पुढे सामाजिक क्षेत्रात काय करावे ? असा प्रश्न माझ्यासमोर होता. संघटणेत काम करावे की, संस्था स्थापून त्यामार्फत काम करावे ? संघटनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पॉकेटमनी साठी सुध्दा आपल्या आई-वडीलांवर रहावे लागते. किमान कार्यकर्त्यांच्या पॉकेटमनी आणि प्रवास खर्चाची तरी सोय करणारी स्वतंतत्र यंत्रणा असली पाहिजे, सुदैवाने माझ्यासमोर ही समस्या नव्हती आणि संयुक्त कूटुंबातील कोणत्याही प्रकारची जबाबदारी नव्हती. तसेच रचनात्मक काम करण्यासाठी लोकांकडून किमान कांही पैसा जमा करण्याची गरज होती. लोकांकडून जमा होणाऱ्या पैशाचा हिशोब पण ठेवता आला पाहिजे, या दॄष्टीने पण नोंदनीकॄत संस्था असण्याची गरज होती.

माझा एकाच वेळी अनेक विषयात इंटरेस्ट होता. शेती, व्यापार, किर्तन-प्रवचन, वनौषधी,आणि सामाजिक कार्य इ. हे सर्व इंटरेस्ट पण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साध्य करता येऊ शकतात, हे ’ अकादमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स ’ च्या अनुभवातून लक्षात आलेले होते. यामुळे वर उल्लेकित परिस्थिती लक्षात घेऊन एक सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कांही समविचारी मित्र आणि मार्गदर्शक यांना सोबत घेऊन १५ ऑगस्ट १९८३ ला “ ग्रामीण विकास लोक संस्था (PIRD) “ या नावाने संस्था स्थापित केली.

मी इयत्ता ९वी मध्ये असतांना म. गांधी यांची जन्मशताब्दी आलेली होती, या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या जीवनावरील परिक्षा देण्याची संधी मिळाली. जीवनचरित्राचा अभ्यास करता – करता महात्माजींच्या व्यक्तीमत्व आणि जगावेगळ्या अतुलनीय कार्याचा माझ्यावर परिणाम झाला. आपणास महात्मा बनने तरी शक्य नाही परंतु , त्यांनी दिलेला “ गावाकडे चला “ हा संदेश मला मार्गदर्शक ठरला, याचवेळी निश्चय केला की, पुढे चालून गावातील लोकांसाठीच काम करायचे. हाच संदेश आणि माझा त्यावेळेचा निश्चय “ ग्रामीण विकास लोक संस्थे “ ची भुमिका आणि कार्य याचा आधार ठरला.

“ ग्रामीण विकास लोक संस्थे “ च्या स्थापपणे पासून आजतागायत प्रमुख कार्यवाहक म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. ग्रामीण विकास लोक संस्थेविषयी अधिक जाणून घेणेकरिता कॄपया खालील साईट, ब्लाग आणि लिंक्सला अवश्य भेट द्यावी.

१०. विविध नेटवर्क मधील सहभाग आणि भुमिका : सामाजिक क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या अनेक संघटना आणि नेटवर्कमध्ये सक्रीय सहभाग राहिलेला आहे, तसेच कांही नेटवर्कमध्ये प्रमुख भुमिका पण निभावण्याची संधी मिळाली आहे. रचनात्मक संघर्ष समिती, महाराष्ट्र चा अध्यक्ष या नात्याने १० वर्षे कामगिरी बजावली आहे. कॅम्पेन अगेन्स्ट चाईल्डलेबर (CACL) करिता ७ वर्षे पर्यंत राज्य निमंत्रक पदी काम केले आहे. राष्ट्रीय निवारा अधिकार आंदोलन च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी ३ वर्षे कार्य. याशिवाय , जबरन जोत आंदोलन, छात्र युवा संघर्ष वाहीनी, आर्य युवक परिषद , नागन इ. संघटनामध्ये सक्रीयपणे सहभाग राहिलेला आहे.

– मच्छींद्र गोजमे

No comments:

Post a Comment